झाशीची राणी अंतरगाव गटाची विषमुक्त शेतीकडे वाटचाल

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
poison-free-farming : पाणी फाउंडेशन, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात विविध गटांत मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील झाशीची राणी तूर उत्पादक शेतकरी गटाचा या स्पर्धेत सहभाग आहे.
 
 
K
 
 
 
गटाच्या निमंत्रक कोमल राजेंद्र बेलखेडे यांनी 17 महिलांना एकत्र आणून गटाची स्थापना केली असून सर्व महिलांनी मिळून कमी खर्चात, शास्त्रीय व एकात्मिक पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला आहे. गटामार्फत बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया तसेच सरी-वरंबा पद्धतीने पेरणी यांसारख्या उपक्रमांची संयुक्तपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 
 
विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गटातील महिलांनी एकत्र येऊन 200 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. यात करंज, कडुलिंब, निर्गुडी, घाणेरी, रुई, कन्हेरी, एरंड, सीताफळ, पपई, धोत्रा व गुळवेल या कडू वनस्पतींची पाने वापरण्यात आली. त्यामध्ये शेण, गोमूत्र, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसणाचा ठेचा व पाणी मिसळून दशपर्णी अर्क तयार करण्यात आला.
 
 
35 दिवसांत तयार होणारा हा अर्क 6 महिन्यांपर्यंत फवारणीसाठी वापरता येतो. रसशोषक किडी व विविध प्रकारच्या अळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तो प्रभावी ठरतो. स्थानिक स्तरावर सहज उपलब्ध होणाèया वनस्पतींपासून तयार होत असल्याने याचा खर्च अत्यल्प येतो. नैसर्गिक घटकांपासून बनलेला असल्यामुळे पिके, प्राणी, मानव तसेच पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे मेंटार राहुल मनवर, उमेदचे राजेंद्र कुरपूडे तसेच पाणी फाउंडेशनचे शुभम पंचभाई व रिता ठवकर यांनी मार्गदर्शन केले.