कोचिंगच्या 'किंग'खानची कोर्टरूममध्ये परीक्षा!

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
पाटणा,
Khan Sir's bail application filed खान ग्लोबल स्टडीज संस्थेशी संबंधित गोळीबार आणि हिंसाचार प्रकरणात नवा टप्पा गाठला गेला असून संस्थेचे संचालक फैसल खान उर्फ खान सर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेल्या दोन सुरक्षारक्षकांच्या जामीन अर्जांवरही न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. तपासादरम्यान सुरक्षारक्षकांनी दिलेल्या जबानीमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. त्यांच्या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी फैसल खान यांचे नावही गुन्ह्यात समाविष्ट केले आहे.
 
 
khan sir
 
घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही खान सर पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या ठिकाणाबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, ते आत्मसमर्पण करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र त्यांच्या वकिलांनी या चर्चांना पूर्णविराम देत अशा कोणत्याही शक्यतेचा इन्कार केला आहे. कायदेशीर मार्गानेच आपली बाजू मांडली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे खान ग्लोबल स्टडीज संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या अग्निसुरक्षा तपासणीत काही त्रुटी आढळून आल्याने संबंधित व्यवस्थापनाला त्या दूर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. नियमांचे पालन न झाल्यास पुढील कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.