महाबळा-इटाळा परिसराला वादळाचा तडाखा

*४ बैल जखमी : घरांची छते उडाली

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
सेलू,
mahabala-itala-area-storm : तालुक्यातील महाबळा-इटाळा शिवारात सोमवार ८ रोजी दुपारच्या सुमारास आलेल्या अचानक जोरदार वादळाने नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली. तर काही ठिकाणी डेरेदार झाडे उन्मळून कोसळली. केळी पिकाला या वादळाचा चांगलाच फटका बसला आहे.
 
 
storm
 
 
 
सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक वादळ सुरू झाले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की काही क्षणांसाठी नागरिकांना समोरचे दिसत नव्हते. वादळामुळे अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली. एका शेतकर्‍याच्या घरावरील टिनाचे छत उडून दुसर्‍या शेतकर्‍याच्या गोठ्यावर जाऊन पडले. त्यामुळे गोठ्यातील ४ बैल जखमी झाले. सोबतच गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे शेतातील पोल्ट्री फॉर्मच्या शेडचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक आणि जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. विद्युत पुरवठा खंडित झाला होता. इटाळा परिसरात एका घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच महाबळाचे सरपंच प्रमोद ढुमणे, पोलिस पाटील चांभारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती तहसीलदार व तलाठ्यांना देण्यात आली आहे.