गोंदिया,
massive-fire-at-kalpathari : शॉट सर्किटमुळे अचानक लागलेल्या भीषण आगीत तीन भावंडांची घरे जळून खाक झाल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी गावात रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत तिन्ही भावांच्या घरातील अन्नधान्यांसह जीवनोपयोगी साहित्य जळून राख झाले असून तिघांचेही कुटूंब उघड्यावर आले आहे.

कलपाथरी येथील गजानन हेमणे व त्यांची तीन मुले सुनील हेमणे, राजकुमार हेमणे व दिलीप हेमणे हे एकमेकांचे शेजारी राहत असून गजानन हेमणे मुलगा सुनील हेमणे यांच्यासह राहतात. दरम्यान, घटनेच्या वेळी रविवारी रात्री सर्वजण जेवण करून बसले असता अचानक शॉट सर्किट होऊन घरात आग लागली. काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररुप धारण केले. आगीच्या ज्वाला पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले होते. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहाणी झाली नसली तरी तिन्ही भावंडांच्या घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवजासह जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे हेमणे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून तिन्ही भावंडांचा संसार उघड्या आला आहे. घटनेची माहिती मिळताच जि.प. सभापती डॉ. लक्ष्मण भगत, पं.स. सभापती चित्रकला चौधरी, उपसभापती रामेश्वर महारवाडे, माजी पं. स. सभापती मनोज बोपचे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष संजय बारेवार, पं. स. सदस्य शशिकला ताराम, माजी उपसरपंच मुकेश खरोले, योगेश चौधरी यांनी हेमणे कुटूंबीयांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला.
महारवाडे यांच्याकडून आर्थिक मदत
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पं.स. उपसभापती रामेश्वर महारवाडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाची विचारपूस केली व त्यांना धीर देत आपल्या वतीने 5 हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली. यावेळी भविष्यात शासनाकडून मिळणारी सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.