फूटले बिंग.. ३0 लाखांचा विमा आणि ३ लाखांची सुपारी

दत्तात्रय चाबरे हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून उलगडा

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
सांगली
Dattatray Chabare सांगली जिल्ह्यातील मिरज–पंढरपूर महामार्गावर हॉटेल प्रेम चोरोची परिसरात आढळलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे. हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, विम्याची रक्कम लाटण्यासाठी मेहुण्यानेच सुपारी देऊन हा कट रचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
 

Dattatray Chabare  
१९ मे रोजी दत्तात्रय चाबरे यांचा मृतदेह मिरज–पंढरपूर महामार्गावर संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा प्रकार अपघात अथवा नैसर्गिक मृत्यू असावा, अशी नोंद पोलिसांनी केली होती. मात्र, मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरील काही संशयास्पद बाबी लक्षात आल्यानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासाची दिशा बदलत तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचा सखोल अभ्यास सुरू केला.
 
 
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मृत दत्तात्रय चाबरे यांच्या नावावर तब्बल ३० लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे या विम्याचे हप्ते त्यांचा मेहुणा रामचंद्र खिलारे स्वतः भरत असल्याचेही निष्पन्न झाले. विम्याची रक्कम मिळवून ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याच्या हेतूने खिलारे याने आपल्या नातेवाईकाची  हत्या  करण्याचा कट रचल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.या योजने अंतर्गत त्याने तुकाराम सांगोलकर याला तीन लाख रुपयांची सुपारी देऊन हा गुन्हा घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांनी संगनमत करून दत्तात्रय चाबरे यांचा निर्घृण खून करत त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
 
या प्रकरणाचा तपास सांगली Dattatray Chabare जिल्हा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अखेर मेहुणा रामचंद्र खिलारे आणि सुपारी घेणारा तुकाराम सांगोलकर यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या धक्कादायक उघडकीनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.