नागपूर,
nagpur-university : राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून पदवी अभ्यासक्रमांसाठी नवीन ‘३:२:१’ परीक्षा व श्रेयांक (क्रेडिट) पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अधिक लवचिकता, बहुविषयकता आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य मिळणार आहे.
विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या अलीकडील बैठकीत विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कला विद्याशाखांतील विविध अभ्यासक्रमांसाठी नवीन अभ्यासक्रम व परीक्षा योजनांना मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात विद्यापीठाने अधिकृत अधिसूचनाही जारी केली आहे.
काय आहे ‘३:२:१’ पद्धत?
नवीन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना तीन मुख्य (मेजर) विषय, दोन ऐच्छिक (मायनर) विषय आणि एक कौशल्याधारित विषय निवडावा लागणार आहे. याशिवाय प्रकल्पाधारित अभ्यासक्रम किंवा इंटर्नशिपलाही अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग बनविण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवही मिळणार आहे.
विज्ञान शाखेत २६ विषयांना मंजुरी
बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, संगणकशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह २६ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. बीसीए अभ्यासक्रमासाठीही सत्र १ ते ८ पर्यंत नवीन परीक्षा पद्धत लागू केली जाणार आहे.
अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमातही बदल
बी.फार्म अभ्यासक्रम भारतीय फार्मसी परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात येणार आहे. तसेच बी.टेक.च्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखांसाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांच्या धर्तीवर सुधारित अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
भारतीय ज्ञान परंपरेला स्थान
नवीन अभ्यासक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘भारतीय ज्ञान प्रणाली’चा समावेश. बीबीए, बीसीए, बीए, बी.कॉम, बी.एस्सी. आणि बी.एस्सी. फायनान्सच्या प्रथम सत्रात ‘सर्वसाधारण भारतीय ज्ञान प्रणाली’ हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना अधिक पर्याय
वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना अकाऊंटिंग अँड टॅक्सेशन, बिझनेस इकॉनॉमिक्स, कमर्शियल सर्व्हिसेस आणि बिझनेस मॅनेजमेंट यांसारख्या विषयांमध्ये मेजर व मायनर निवडीची संधी मिळणार आहे. तर कला शाखेत समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि राज्यशास्त्र यांसारख्या विषयांसाठी सुधारित अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.