मुंबई,
Nana Patekar ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या प्रभावी अभिनयाबरोबरच भूमिकेत पूर्णपणे समरस होण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, त्यांच्या एका कृतीमुळे अभिनेत्री मधू शाह यांनीही त्यांना थेट कानाखाली मारल्याचा धक्कादायक खुलासा नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या यशवंत या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला हा प्रसंग मधू यांनी सांगितला.
मधू यांनी सांगितले की, ‘यशवंत’ चित्रपटातील एका अत्यंत महत्त्वाच्या भावनिक दृश्याचे चित्रीकरण सुरू होते. त्या काळात त्या मेथड अॅक्टिंगचा अभ्यास करत होत्या आणि प्रत्येक दृश्य वास्तवदर्शी करण्याचा प्रयत्न करत होत्या. संबंधित दृश्यात रडण्याची आवश्यकता होती. त्यासाठी कलाकारांच्या डोळ्यांत ग्लिसरीन घालण्याची तयारी सुरू होती. मात्र, नाना पाटेकर यांनी त्याला विरोध करत भावनांचा अनुभव घेऊन नैसर्गिकरित्या अश्रू यायला हवेत, असे मत व्यक्त केले.
तथापि, त्या क्षणी आपल्याला रडू येत नसल्याचे मधू यांनी सांगितले. याचदरम्यान नाना पाटेकर यांनी अचानक जोरदार झापड मारल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, अशा प्रकारची कोणतीही कृती रिहर्सलमध्ये ठरलेली नव्हती. त्यामुळे आपण पूर्णपणे हादरून गेलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर सेटवर Nana Patekar काही काळ शांतता पसरल्याचे मधू यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, त्या काळात त्यांचा स्वभाव अतिशय तापट होता. त्यामुळे नाना पाटेकर यांनी झापड मारताच आपणही त्यांना तत्काळ कानाखाली मारली.मात्र, या अनपेक्षित घटनेचा चित्रपटातील त्या भावनिक दृश्याला फायदा झाल्याचेही मधू यांनी नमूद केले. त्यांच्यानुसार, हा चित्रपटातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता आणि दिग्दर्शक अनिल मट्टू यांनी त्यासाठी संपूर्ण दिवस राखून ठेवला होता. पण त्या प्रसंगानंतर निर्माण झालेल्या वास्तविक भावनांमुळे दृश्याचे चित्रीकरण अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण झाले.