झ्युरिक/नवी दिल्ली,
2026-fifa-world-cup : फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला ‘स्मार्ट फुटबॉल’ वापरला जाणार आहे. Adidas कंपनीने विकसित केलेल्या ‘ट्रायोंडा’ (Trionda) या अधिकृत सामन्याच्या चेंडूमध्ये विशेष मोशन सेन्सर आणि एआय-आधारित तंत्रज्ञान बसविण्यात आले असून सामन्यापूर्वी हा चेंडू मोबाईलप्रमाणे चार्ज करावा लागणार आहे.
या स्मार्ट चेंडूमध्ये बसविलेला सेन्सर चेंडूच्या हालचाली, स्पर्श, पास, शॉट आणि डिफ्लेक्शनची माहिती प्रत्यक्ष वेळेत (Real-Time) नोंदवतो. ही माहिती थेट VAR (व्हिडिओ असिस्टंट रेफरी) प्रणालीकडे पाठवली जाते. त्यामुळे ऑफसाइड, हँडबॉल आणि इतर वादग्रस्त निर्णय अधिक अचूकपणे घेण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे हा सेन्सर प्रति सेकंद सुमारे ५०० वेळा डेटा नोंदवू शकतो. त्यामुळे खेळाडूने चेंडूला नेमका कधी स्पर्श केला, याची अचूक माहिती रेफरींना मिळणार आहे. यामुळे सामन्यातील निर्णयप्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल, असा FIFAचा विश्वास आहे.
या चेंडूची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे सहा तास कार्यरत राहते. त्यामुळे प्रत्येक सामन्यापूर्वी चेंडू चार्ज करणे आवश्यक असेल. मात्र या तंत्रज्ञानामुळे चेंडूचे वजन, उडण्याची क्षमता किंवा खेळाडूंच्या खेळावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे Adidasने स्पष्ट केले आहे.
२०२६ चा FIFA विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये होणार असून हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक ठरणार आहे. नव्या स्मार्ट चेंडूमुळे फुटबॉलच्या जगात तंत्रज्ञानाचा आणखी एक नवा अध्याय सुरू होणार असल्याची चर्चा आहे