पहिल्याच कसोटीत 'मानव'चा महापराक्रम!

पहिल्याच कसोटी डावात ३३ धावांत ६ बळी

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
News about Manav Suthar भारतीय क्रिकेटला आणखी एक आश्वासक गोलंदाज मिळाल्याचे संकेत देत युवा फिरकीपटू मानव सुथारने आपल्या कसोटी पदार्पणातच इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच डावात त्याने ३३ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांची दाणादाण उडवली. या शानदार कामगिरीमुळे तो पदार्पणाच्या कसोटी डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या मोजक्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दाखल झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच मानवने अचूक टप्पा आणि प्रभावी फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या फलंदाजीवर वर्चस्व गाजवले. त्याच्या गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोठी खेळी उभारता आली नाही. परिणामी, अफगाणिस्तानचा डाव लवकर आटोपला आणि भारताला सामन्यात मजबूत पकड मिळाली.
 
 
News about Manav Suthar
 
मानव सुथारच्या या कामगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण २१ व्या शतकात कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात पाच किंवा अधिक बळी घेणारा तो केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत अमित मिश्राने अशी कामगिरी केली होती. तब्बल १८ वर्षांनंतर मानवने हा दुर्मिळ पराक्रम पुन्हा साध्य केला आहे.भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. त्या यादीत आता मानव सुथारचे नावही अभिमानाने घेतले जाईल. त्याच्या या दमदार सुरुवातीमुळे भारतीय संघाला भविष्यासाठी एक विश्वासार्ह फिरकीपटू मिळाल्याची भावना क्रिकेट वर्तुळात व्यक्त होत आहे. दरम्यान, पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा भारतीय आणि जागतिक विक्रम आजही माजी फिरकीपटू नरेंद्र हिरवाणी यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८८ मध्ये आपल्या पहिल्याच कसोटीत तब्बल १६ बळी घेत जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. मानव सुथारने मात्र आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार छाप सोडत भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यास नवी आशा दिली आहे.