वर्धा,
nilgais-fell-into-a-well : पाण्याच्या शोधात आलेल्या ८ नीलगाईंचा कळप शेतातील विहिरीत पडला. मृत्यूची झुंज देत असलेल्या या नीलगाईंना वनविभागाच्या पथकाने तब्बल ३ तास विशेष मोहीम राबवून सुरक्षीत बाहेर काढले. ही घटना वर्धा वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील वडनेर राऊंड मधील मौजा जांगोणा येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा जांगोणा येथील श्याम सयाम यांच्या शेतातील खचलेल्या विहिरीत काही नीलगाई पडल्याची माहिती सरपंच नितीन वाघ यांनी प्रादेशिक वन विभागाच्या अधिकार्यांना दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक हरवीर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरिलाल सरोदे, माधव आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांच्या मार्गदर्शनातील चमू तातडीने घटनास्थळी पोहोचली. जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर रॅम्प तयार करून नीलगाईंना बागहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ७ वाजता युद्धपातळीवर रॅम्प तयार करण्यास सुरूवात झाली. सुमारे ९.३० वाजताच्या रॅम्प तयार झाला. पण घाबरलेले वन्यजीव रॅम्पने विहिरीबाहेर येण्यास धजावत होते. ९.४५ वाजताच्या सुमारास आठ पैकी एका नीलगाय रॅम्पने विहिरीबाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्या पाठोपाठ इतरही ७ नीलगाई विहिरीबाहेर आल्या.