मनीला,
Philippines earthquake news फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील भागाला सोमवारी सकाळी शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी नोंदविण्यात आली असून त्यानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटावरील जनरल सँटोस शहराजवळ असल्याचे फिलिपिन्सच्या भूकंप निरीक्षण संस्थेने सांगितले. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. हादऱ्यांमुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने वृत्त लिहिपर्यंत कोणतीही मोठी जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नव्हते.
भूकंपानंतर पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने इशारा जारी करत फिलिपिन्सच्या काही किनारपट्ट्यांवर तीन मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच इंडोनेशिया आणि मलेशियाच्या काही भागांनाही संभाव्य त्सुनामीचा धोका असल्याचे सांगण्यात आले. तैवान, जपान, ग्वाम, पापुआ न्यू गिनी तसेच पश्चिम पॅसिफिकमधील अनेक बेट राष्ट्रांमध्येही लहान स्वरूपाच्या त्सुनामी लाटा पोहोचू शकतात.फिलिपिन्सच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने किनारी भागातील नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आणि उंच किंवा सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी आणि उत्तर मालुकू प्रांतांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या मुख्य भूकंपापूर्वी आणि त्यानंतर काही तासांत तीन तीव्र धक्क्यांची नोंद झाली. पहिला धक्का ७.७ तीव्रतेचा होता, त्यानंतर ६.४ आणि ६.६ तीव्रतेचे आणखी दोन भूकंप झाले. या सलग धक्क्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि चक्रीवादळांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फिलिपिन्सचा समावेश जगातील सर्वाधिक आपत्तीप्रवण देशांमध्ये होतो. हा देश पॅसिफिक महासागरातील 'रिंग ऑफ फायर' या अतिसंवेदनशील भूकंपीय पट्ट्यात असल्यामुळे येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात.