गोंदिया,
rajendra-jain : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे राज्यसभेच्या जागेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महायुतीतील वरीष्ठ पदाधिकार्यांच्या उपस्थितीत त्यांनी सोमवारी 8 जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, सोमवारी जैन यांनी आपले नामांकन अर्ज दाखल करताच गोंदियात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले राजेंद्र जैन हे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. दरम्यान, भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, महायुतीतील जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी मोठी राजकीय घडामोड घडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर पक्षांतर्गत चर्चांना वेग आले होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोर कमिटी बैठकीत या जागेच्या उमेदवारीसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाला पसंती मिळाली. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त कळताच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पक्ष पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त करत आनंद व्यक्त केला. त्यात सोमवारी सकाळपासूनच येथील राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दुपारी जैन यांनी पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करताच येथील राष्ट्रवादी कार्यालयासह पाल चौक परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला.
माताजी आपके दो-दो बेटे खासदार बन गये....
राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आल्यानंतर खा. प्रफुल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी माज आ. राजेंद्र जैन यांच्या घरी भेट देत त्यांच्या आईला ‘आपके दो दो बेटे खासदार बन गये’ असे म्हणत आनंद व्यक्त केला.