नागपूर,
Rashtra Sevika Samiti आध्यात्मिक साधना करण्यासाठी, आपल्या संघटनेसाठी योग्य असे गुण जोपासण्यासाठी व समाजरुपी देवाची सेवा करण्यास पात्र होण्यासाठी आपण या प्रवीण वर्गात आलो आहोत. या राष्ट्र जागृतीच्या काळात, आपण सर्वांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. साधना आपल्याला शक्ती देते. पराभव नाम संवत्सरात , आपण आपल्या देशाला विजयाकडे नेले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री अन्ननदानम यांनी केले. समिती आपल्या ९० व्या वर्षात पदार्पण करत असून या प्रवीण वर्गानिमित्त सर्वांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
Rashtra Sevika Samiti राष्ट्र सेविका समितीच्या प्रवीण शिक्षा वर्गाचे उद्घाटन रेशीमबागमध्ये झाले. प्रमुख संचालिका शांतक्का, वर्ग अधिकारी मुक्ता ठाकूर (हिमाचल प्रांत कार्यवाहिका ) व्यासपीठावर उपस्थित होत्या. देशभरातील २८ राज्य तसेच नेपाळमधून मिळून एकूण ११५ प्रशिक्षणार्थी आल्या आहेत. त्यांचे प्रशिक्षण २४ जूनपर्यंत होईल. सीता गायत्री पुढे म्हणाल्या, ‘बौद्ध धर्माची तीन तत्त्वे आहेत; आपण त्यांना बौद्ध त्रिकुट म्हणतो: बुद्धं शरणं गच्छामि, संघ शरणं गच्छामि, आणि धम्मं शरणं गच्छामि. समाजाचे एक भव्य स्वप्न पाहण्यासाठी संघटनेत आलो आहोत.
ब्रह्मतेज आणि क्षत्रियतेज प्राप्त करून आपण समाजाला जागृत केले पाहिजे. आपण ज्ञानी झाले पाहिजे आणि देशासाठी आपण स्वतःला लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले पाहिजे. प्रवीण झाल्यावर, आपण आपल्या ध्येयाच्या मार्गावर पुढे जात राहिले पाहिजे.‘