विदर्भातील शाळा २९ जूनपासून सुरू करा

शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
वर्धा,
schools-in-vidarbha : यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत ४५ ते ४७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला. देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणार्‍या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. या पृष्ठभूमीवर शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विदर्भातील शाळा १५ ऐवजी २९ जूनपासून सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सोमवार ८ रोजी केली.
 
 
k
 
 
 
अनेक शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे थंड पाणी, सावलीची व्यवस्था किंवा उष्णतेपासून संरक्षणाची साधनं नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागू शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. यावर्षी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने पालकांनी चिंता व्यत केली आहे. हवामानातील बदल आणि विलंबाने होणारे पावसाचे आगमन यामुळे उष्णतेचा कालावधी अधिक लांबला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे ना. डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून विदर्भातील शाळा २९ जून पासून सुरू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे मान्य केले. शिक्षक संघटना व पालकांकडून शाळा सुरू होण्याची तारीख वाढविण्याबाबत मागील काही दिवसांपासून मागणी होत होती.