विदर्भातील शाळांबाबतचा होणार निर्णय

उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
अमरावती,
schools-in-vidarbha : विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाढत्या तापमानाच्या पृष्ठभूमीवर हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक आणि अव्यवहार्य असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. उन्हाळी अवकाशकालीन न्यायपीठासमोर तातडीने झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावत ९ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. आता विदर्भातील शाळा कधी सुरू होणार याचा निर्णय मंगळवार ९ जूनला होणार आहे.
 
 
k
 
 
 
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष वर्धेचे विजय कोंबे आणि नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्या. रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली होती. याचिकेनुसार, विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने २८ मार्च २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार घेतला आहे. तसेच, शाळांना १५ ते ३० जूनदरम्यान सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत वर्ग घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, विदर्भातील तापमान जून महिन्यात ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. तसे अधिकृत नोंदींमधून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना तीन ते पाच किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते. सकाळी सात वाजेपर्यंत शाळेत पोहोचणे तसेच दुपारी १२ नंतर प्रखर उन्हात घरी परतणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.
 
 
याचिकेत २००७ मधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्यावेळीही विदर्भातील उष्णतेच्या पृष्ठभूमीवर शाळा ३० जूननंतरच सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. राज्य सरकारने त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. मात्र, ती नंतर मागे घेण्यात आली होती. उच्च न्यायालयाने नोटीस बजावत उन्हाळी अवकाशानंतर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. प्रकरणाची सुनावणी मंगळवार ९ जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारी विदर्भातील शाळा कधी सुरु होणार याचा निर्णय न्यायालय देणार आहे. या निर्णयाकडे विदर्भातील शिक्षकांचे लक्ष लागून असल्याची अशी माहिती समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे.