वेध
हेमंत सालोडकर
ST revenue सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अर्थात एसटीच्या हितसंरक्षणाची जबाबदारी म्हणून बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध वाहतूक केल्यास संबंधितांना तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागाला शहराशी जोडणाèया एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल अशी आशा आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे बसस्थानक परिसरात कायद्याचे काटेकोर पालन करून अवैध वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी प्रशासनाने काही नियमांचे पालन करणे अपेक्षित असल्याने समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. ही अपेक्षा व्यक्त करतानाच प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि दर्जेदार सेवा देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 5 ते 15 जून या दरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील शिस्त वाढण्यास, एसटीचे उत्पन्न वाढण्यास आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुव्यवस्थित सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, यात शंका नाही.
सर्वांची लाडकी एसटी ही नेहमीच तोट्यात असते. तिचे उत्पन्न वाढावे यासाठी शासनातर्फे नेहमीच उपाय शोधले जातात. पण फारसा उपयोग होताना दिसत नाही. त्याला अनेक कारणे असली तरी बसस्थानकाबाहेरून होणारी अवैध प्रवासी वाहतूक हेही एक मुख्य कारण आहे. आता या अवैध प्रवासी वाहतुकीलाच चाप बसणार आहे. सर्व एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात होणाèया अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घातला जाणार आहे. त्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. ही अवैध वाहतूक रोखली गेल्यास एसटी महामंडळाच्या उत्पन्नात आपोआप भर पडणार आहे. या मोहिमेअंतर्गत पुढील दहा दिवस सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसे परिपत्रक एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने जारी केले आहे. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात खाजगी वाहने उभी करून प्रवाशांची वाहतूक करणे यावर बंदी राहणार आहे. असा नियम केला तरी यापुढे अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही हे कशावरून? काही लोक यातून पळवाट काढतीलच. त्यांना कोण रोखणार?
ST revenue ग्रामीण भागाला शहराशी जोडणारी अशी एसटीची ओळख आहे. कितीतरी निकृष्ट दर्जाच्या बसेसमधून आजही लोक प्रवास करीत आहेत. ग्रामीण भागात आजही एसटीला पर्याय नाही. त्यामुळे लोक त्यानेच प्रवास करतात. पण शहरात अशी परिस्थिती आहे का? नागपूर किंवा मोठ्या शहरांच्या बसस्थानकाबाहेरून अवैध प्रवासी वाहतूक सुरूच असते. अनेक जण जवळपासच्या जिल्ह्यात जाण्यासाठी खाजगी चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यात एकटे जाण्यापेक्षा एसटीच्या भाड्याएवढे पैसे देऊन लोक प्रवास करतात आणि आपल्या नियोजित स्थळी पोहोचतात. काही जण म्हणतील यात गैर काय आहे? त्यांच्या दृष्टीने असा प्रवास करणे सोयीस्कर ठरेल. निकृष्ट दर्जाच्या बसने जाण्यापेक्षा वातानुकूलित कारने जाणे कधीही चांगले, असेच मत त्यांचे असणार. पावसाळ्यात गळती लागलेल्या बसपेक्षा खाजगी वाहनाचा प्रवास कधीही चांगला, हाच विचार ते करतील. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वेळ वाचणे. उत्तम सुविधा आणि वेळेची बचत होत असेल तर लोक खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडतील.
चांगल्या सुविधा मिळाल्या तर लोक अधिकचे पैसे देऊनही प्रवास करतात हे शिवाई बसने सिद्ध केले आहे. आरामदायक सीट, वातानुकूलित यंत्रणा आणि नियोजित स्थळी लवकर पोहोचण्याची हमी असल्याने लोकांनी शिवाई बसला पसंतीची पावती दिली आहे. आता शासनाने अनेक पर्यावरणपूरक बसेस विकत घेण्याचे ठरवले आहे. त्यासोबतच ती योग्यरीत्या चालवणारे चालक आणि प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळाली तर लोक जास्तीचे पैसे देऊनही एसटीला पसंती देतील. मोठ्या शहरांत सार्वजनिक वाहतूक सुविधा असतानाही लोक अधिकचे पैसे मोजून कॅबने जातातच. नियम कडक करून काही दिवसांसाठी अवैध वाहतुकीला चाप बसेलही पण सुविधा मिळाल्या नाही तर येरे माझ्या मागल्या अशी स्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतरांची रेष लहान करण्यापेक्षा आपली रेष कशी मोठी होईल याकडे परिवहन मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांची पावले बसस्थानकांकडे वळतील आणि एसटीचे उत्पन्नही वाढेल.
9850753281