ममतांच्या आणखी एका शिलेदाराने सोडली साथ!

सुखेंदू शेखर रॉय यांचा पक्षाला रामराम

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली/कोलकाता,
Sukhendu Sekhar Roy's resignation तृणमूल काँग्रेसला मोठा राजकीय धक्का देत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून पक्षांतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.राजीनामा सादर केल्यानंतर रॉय यांनी पक्षातील वातावरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे पक्षात आपल्याला दुय्यम वागणूक देण्यात आली आणि एकाकी पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
 
 
 
Sukhendu Sekhar
रॉय यांनी राज्यसभा सभापतींकडे आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बंगालमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. राज्यातील जनतेमध्ये विविध प्रश्नांबाबत असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. काही संवेदनशील घटनांमुळे हा असंतोष अधिक तीव्र झाला असून त्याचा परिणाम निवडणुकांमध्येही दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले.सुखेंदू शेखररॉय हे तृणमूल काँग्रेसमधील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जात होते. पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या राजकीय टप्प्यांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा केवळ एका खासदाराचा निर्णय नसून पक्षासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांनी अद्याप कोणत्याही नव्या पक्षात प्रवेशाबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली, तरी भविष्यात ते नवा राजकीय पर्याय स्वीकारू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांच्या निर्णयामुळे तृणमूल काँग्रेससमोर नव्या राजकीय आव्हानांची चर्चा सुरू झाली आहे.