यवतमाळ,
Swatantryaveer Savarkar Jayanti मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, स्वा. सावरकर स्मारक समिती, स्वा. सावरकर विचार मंच आणि साई इंग्लिश लर्नर अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साई इंग्लिश लर्नर अॅकॅडमी येथे भाषण स्पर्धेने झाली. अमित ढोणे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या स्पर्धेत अभियांत्रिकी शिक्षण घेणारे व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक सहभागी झाले. स्पर्धकांनी मराठी व इंग्रजीतून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर प्रभावी भाषणे सादर केली.
या स्पर्धेत निवेदिता इंगोले हिने प्रथम क्रमांक, रूपेश झाले यांनी द्वितीय क्रमांक तर केतकी इंगोले हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे यांनी युवकांना ‘मेरा युवा भारत’ उपक्रमाची माहिती दिली. दत्तचौकात स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचच्या विद्यमाने स्वा. सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
Swatantryaveer Savarkar Jayanti हनुमान आखाडा चौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्त्या डॉ. ललिता घोडे यांनी सावरकरांच्या जीवनपटाचा सखोल आढावा घेत त्यांची देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर माहिती दिली. तरुण वयात अनेक हालअपेष्टा सहन करून देशासाठीच्या त्यांच्या योगदानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष नगरसेवक मनीषा भावे यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले. संचालन राम साकळे यांनी केले. कार्यक्रमासाठी ब्राह्मण महासभा अध्यक्ष संजीव जोशी, हिंदू महासभेचे लक्ष्मणलाल खत्री, यवतमाळ अर्बन बँक संचालक परिमल देशपांडे, रोशन यादव, मुन्ना अतकुलवार आणि राम भुतेवार, सूरज शिंदे यांनी परिश्रम घेतले.