तेल अवीव/तेहरान,
Tehran-Tel Aviv tensions rise इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून दोन्ही देशांमधील तणावाने धोकादायक वळण घेतले आहे. रविवारी रात्री इराणकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या हल्ल्यांनंतर संपूर्ण परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून युद्धविरामाच्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रात्री उशिरा डागण्यात आलेली अनेक क्षेपणास्त्रे वेस्ट बँक परिसराच्या आकाशात दिसून आली. हवाई संरक्षण यंत्रणा तत्काळ सक्रिय करण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही कठोर भूमिका घेत इराणला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढत्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त करत इराणला हल्ले तातडीने थांबवण्याचा इशारा दिला आहे. संघर्ष सुरू राहिल्यास युद्धविराम आणि शांतता चर्चेचे प्रयत्न धोक्यात येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व पक्षांनी संयम बाळगून संवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.या नव्या संघर्षाची पार्श्वभूमी लेबनॉनमधील घडामोडींशी जोडली जात आहे. इस्रायली सैन्याने बेरूत परिसरातील हिजबुल्लाशी संबंधित ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया नोंदवत इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. याआधीही लेबनॉनवरील कोणत्याही हल्ल्याला उत्तर दिले जाईल, असा इशारा इराणकडून देण्यात आला होता.
युद्धविराम लागू झाल्यानंतरचा हा पहिला मोठा हल्ला मानला जात असून त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या चर्चांवरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, लेबनॉनमधील हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. वाढत्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील सुरक्षेचे वातावरण अधिकच बिघडले असून व्यापक युद्धाचा धोका पुन्हा वाढल्याची चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली जात आहे.