तुकाराम मुंडेंचे परळीतून अपहरण; धोत्र्यात सुटका!

*५ कोटींच्या खंडणीसाठी झाले अपहरण

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट, 
tukaram-mundhe : बीड जिल्ह्यातील परळी येथून अपहरण करण्यात आलेल्या तुकाराम मुंडे यांची हिंगणघाट मार्गावरील धोत्रा परिसरात सुटका करण्यात आल्याची घटना रविवार ७ रोजी उघडकीस आली. अपहरणकर्त्यांनी मुंडे यांच्या कुटुंबीयांकडे ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच अपहरणकर्त्यांनी त्यांना नजिकच्या धोत्रा गावाजवळील निर्मनुष्य रस्त्यावर पट्टी बांधून सोडून पसार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, धास्तावलेल्या अवस्थेत मदतीकरिता याचना करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका तरुणाने त्यांना हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन केले.
 
 
 
jklk
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंडे (रा. परळी, जि. बीड) हे परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात काम आटोपून ४ जून रोजी दुपारी घरी परतत असताना तीन अज्ञातांनी त्यांना बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून अपहरण केले. दरम्यान, कुटुंबीयांकडे ५ कोटींच्या खंडणी मागण्यात आली. बीड पोलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक आरोपींचा शोध घेत विविध ठिकाणी तपास करत अमरावती पर्यंत मागावर होते. दरम्यान, ७ रोजी धोत्रा परिसरातील रस्त्यालगत डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडण्यात आल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी मदतीसाठी हाक दिली. त्या मार्गाने दुचाकीवरून जात असलेले प्रसन्ना मांडवकर (रा. आजदा) यांनी त्यांना धीर दिला. मुंडे यांनी आपल्यासोबत घडलेली संपूर्ण आपबिती सांगितली. प्रसन्ना मांडवकर यांनी मुंडे यांना आपल्या दुचाकीवरून हिंगणघाट पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने त्यांच्या नातेवाईकांशी तसेच परळी पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तुकाराम मुंडे यांना पुढील तपासासाठी परळी पोलिसांच्या ताब्यात दिले.