कारंजा लाड
tur prices खरीप हंगामासाठी शेतीची तयारी सुरू असतानाच कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीतील तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकर्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अवघ्या आठवडाभरात तुरीचा दर प्रतिक्विंटल ८२०० रुपयावरून ७७०० रुपयांपर्यंत खाली आला असून, तब्बल ५०० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
tur prices कारंजा तालुयासह परिसरातील अनेक शेतकरी सध्या खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि मशागतीच्या खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी तूर विक्रीकडे वळले आहेत. मात्र बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांची आर्थिक गणिते कोलमडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कृषी निविष्ठांच्या किंमती वाढल्या असून, उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत तुरीच्या दरातील घसरणीमुळे शेतकर्यांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

tur prices बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याचा परिणाम दरावर झाल्याचे व्यापारी वर्गाचे मत आहे. तसेच विविध बाजार समित्यांतील दरस्थिती, व्यापार्यांची खरेदी क्षमता आणि बाजारातील एकूण व्यवहार यांचाही परिणाम तुरीच्या भावावर होत असल्याचे सांगितले जात आहे.तुरीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे अनेक शेतकरी विक्री थांबवून दरवाढीची वाट पाहण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र खरीप हंगामासाठी तातडीने पैशांची गरज असल्याने अनेकांना कमी भावातही माल विकण्याची वेळ आली आहे. परिणामी शेतकर्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे. खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर तुरीच्या दरातील ही घसरण शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय ठरली असून आगामी काळात बाजारभावात सुधारणा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
tur prices आवक कमी असतानाही दर घसरले
कारंजा बाजार समितीत सोमवारी तुरीची २३५० क्विंटलची आवक नोंदविल्या गेली. सोमवारी तुरीला कमीत कमी ६८००, सरासरी ७४०० आणि अधिकाधिक ७७०० रुपयांचा दर मिळाला. एकीकडे सरकार तुरीला यंदाच्या हंगामात ८४५० रुपयांचा हमीभाव असल्याचा गाजावाजा करीत आहे तर दुसरीकडे शेतकर्यांना गरजेपोटी मिळेल त्या भावात तुरीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.