अमरावतीत परिवहन मंत्र्यांकडून दोघांचे निलंबन

-बस स्थानकाची आकस्मिक पाहणी -अस्वच्छता व गैरसोयीवरून प्रचंड संताप

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
suspended : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रविवारी पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांनी अचानक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला भेट देत पाहणी केली. येथील अस्वच्छता, चालक - वाहकांच्या विश्रांतीगृहाची स्थिती पाहून ते संतप्त झाले. त्यांनी तात्काळ विभागीय वाहतूक नियंत्रक आणि बस स्थानक व्यवस्थापक यांच्या निलंबनाच्या सूचना एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या. या कारवाईमुळे परिवहन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
jlk
 
 
 
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मध्यवर्ती बस स्थानकात येताच त्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी केली. तेथील अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उपस्थित अधिकार्‍यांना जाब विचारला. स्वच्छतेसाठी कंत्राटदारांवर मोठा खर्च केला जातो, मग प्रत्यक्षात स्वच्छता का दिसत नाही, असा सवाल त्यांनी केला. यानंतर ते बस स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील चालक - वाहकांच्या विश्रांतीगृहात गेले. तेथे उपस्थित चालक-वाहकांशी चर्चा करताना अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. नव्या गाद्या त्यांच्या भेटीच्या काही तासांपूर्वीच उपलब्ध करून देण्यात आल्याचे चालक-वाहकांनी सांगितले. याशिवाय विश्रांतीगृहातील स्वच्छतागृहांचा वापर बाहेरील व्यक्तींकडून होत असल्याने तेथील परिस्थितीही अत्यंत वाईट असल्याचे समोर आले.
 
 
या प्रकारामुळे मंत्री सरनाईक यांनी विभागीय वाहतूक नियंत्रक सचिन डफळे यांना धारेवर धरत तात्काळ स्पष्टीकरण मागितले. त्यानंतर त्यांनी मुंबईस्थित एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून विभागीय वाहतूक नियंत्रक आणि अमरावती मध्यवर्ती बस स्थानक व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या. चालक-वाहक तसेच प्रवाशांच्या सुविधांबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
 
 
दर चार तासांनी स्वच्छता
 
 
-प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. संपूर्ण बसस्थानक परिसराची दर चार तासांनी स्वच्छता झालीच पाहिजे. चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहात योग्य व्यवस्था, प्रवाशांसाठी थंड पिण्याचे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. कंत्राटदारांकडून कामाची काटेकोर अंमलबजावणी करून घेतली पाहिजे. मात्र येथे या सर्व बाबींचा अभाव आढळून आला. त्यामुळे दोन अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ देण्यात आले आहेत.
-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री