नागपूर,
jit-mun : देशाच्या भविष्यातील नेतृत्व घडविण्याच्या उद्देशाने झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जेआयटी) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील युवा संसद ‘जेआयटी एमयूएन’ चे उद्घाटन नागपूरच्या ऐतिहासिक विधान भवन संकुलात उत्साहात झाले. देशभरातून आलेल्या शेकडो युवा प्रतिनिधींनी या बौद्धिक अधिवेशनात सहभाग घेत लोकशाही, धोरणनिर्मिती आणि राष्ट्रकार्यातील आपल्या भूमिकेचा प्रभावी अनुभव घेतला.
‘समृद्धी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ (एसएससीटी) संचालित तसेच नॅक अ+ आणि एनबीए मान्यताप्राप्त स्वायत्त संस्थेच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांना कायदेनिर्मिती प्रक्रियेची ओळख करून देणे आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांचा सहभाग वाढविणे हा होता.
उद्घाटनप्रसंगी नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांनी स्मार्ट आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी तरुणांची जागरूकता व नेतृत्वगुण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता नेतृत्वाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दानी यांनीही तरुणांना राजकारण व धोरणनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. नेतृत्वाला वयाचे बंधन नसते आणि देशाला योग्य दिशा देण्यासाठी युवकांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या युवा संसदेला एसएससीटी चे अध्यक्ष महेश साधवानी, सचिव वीरेंद्र कुकरेजा, संचालक (तांत्रिक) प्रमोद पंपतवार, डॉ. हेमंत असरानी, प्राचार्य डॉ. नरेंद्र बावणे, उपप्राचार्य डॉ. सोहेल भुरा आणि डॉ. उमा पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.
विविध सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, शिक्षण धोरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने उपस्थित मान्यवर प्रभावित झाले. समारोपप्रसंगी वेदांत इजमलवार आणि डॉ. उमा पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले. जेआयटी एमयूएनमुळे तरुणांमध्ये लोकशाही प्रक्रियेविषयी जागरूकता आणि नेतृत्वाचे भान अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.