सांगली,
Pooja Sawant सांगलीकडे चित्रपटाच्या प्रचारासाठी जात असताना मराठी अभिनेत्री पूजा सावंत आणि ‘कपबशी’ चित्रपटाच्या टीमला अपघाताचा सामना करावा लागला. सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात महामार्गावर तीन वाहनांची एकमेकांना धडक बसल्याने ही घटना घडली. या अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. चित्रपटाच्या प्रचार मोहिमेसाठी पुण्याहून सांगलीकडे निघालेल्या टीममध्ये अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे यांचा समावेश होता.

प्रवासादरम्यान अचानक झालेल्या अपघातात संबंधित वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या सर्वांची जीवितहानी टळली.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या. या घटनेत काही जणांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती असली तरी कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या दुर्घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र पूजा सावंत, ऋषी मनोहर आणि इतर सर्व सदस्य सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघातामुळे वाहनांचे नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ टळल्याने संपूर्ण टीमने समाधान व्यक्त केले आहे.