डेहराडून,
Brides father dies उत्तराखंडमधील खतिमा शहरात एका विवाह सोहळ्यादरम्यान हुंडा आणि मेहरच्या रकमेवरून झालेल्या वादाने दुर्दैवी वळण घेतले. वधूच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने आनंदाचे वातावरण क्षणात शोककळेत बदलले. या घटनेनंतर लग्नस्थळी मोठा गोंधळ उडाला असून पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बरेली येथून वरात खतिमा येथे आली होती. सुरुवातीला सर्व विधी आणि स्वागत समारंभ सुरळीत पार पडले. मात्र, विवाह प्रक्रियेदरम्यान मेहरची रक्कम आणि कथित हुंड्याच्या मागण्यांवरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. वधूपक्षाने वरपक्षावर लग्न ठरल्यानंतर सतत नव्या मागण्या केल्याचा आरोप केला आहे. सुरुवातीला स्कूटर, त्यानंतर मोटरसायकल आणि नंतर एक लाख रुपये रोख देण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वाद वाढत असताना मेहरच्या रकमेवरूनही दोन्ही बाजूंमध्ये मतभेद झाले. या चर्चेदरम्यान वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. परिस्थिती शांत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच वधूच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वधूपित्याच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. काही संतप्त व्यक्तींनी वर आणि त्याच्या नातेवाईकांना लग्नस्थळीच रोखून धरल्याचा आरोप आहे. यावेळी काही ठिकाणी धक्काबुक्की आणि गोंधळही झाल्याचे सांगितले जाते. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच अनेक पाहुण्यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे. पोलिसांकडून दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवले जात असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासानंतर उपलब्ध पुरावे आणि तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.