300 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा
जिल्ह्यात 10433 हेक्टरवर लागवड करणार
वर्धा :
Collector Vanmathi C राज्यात वनाच्छादीत क्षेत्राचे प्रमाण 33 टक्के पर्यंत वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 10 हजार 433 हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे विभागांनी तातडीने वृक्षलागवडीची जागा व रोपांची निश्चिती करावी. येत्या पावसाळ्यात जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिले.
वृक्ष लागवड मोहिमेच्या जिल्हास्तरीय नियोजन, समन्वय, अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्यासह सामाजिक वनीकरण, वन विभाग, बांधकाम, जलसंपदा, पोलिस, भूजल सर्वेक्षण, भूमी अभिलेख, पंचायत आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी पुरेशी झाडांची संख्या उपलब्ध आहे. विभागांनी लागवडीचे नियोजन करतांना जागेची निश्चिती आणि आवश्यक नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्या विभागास किती वृक्ष लागणार आहे, याची मागणी सामाजिक वनिकरण विभागाकडे करण्यात यावी. विभागांनी यासाठी लागणारा खर्च आपल्या स्तरावर किंवा सामाजिक दायित्व निधीतून भागवावा. नरेगा किंवा अन्य विभागाच्या योजनांचे समायोजन करून वृक्ष लागवडीची मोहिम यशस्वीपणे पार पाडावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींनी आपल्या स्तरावर नियोजन करावे. ग्रामीण भागासाठी तालुकास्तरावर तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. ग्रामपंचायतस्तरावर उत्तम नियोजन करून लागवड करण्यात यावी. विभागांना महसूल, वन किंवा इतर विभागाच्या जागेवर देखील लागवड करता येईल, यासाठी आवश्यक परवानगी तहसिलदारांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.
Collector Vanmathi C ज्या विभागांकडे लागवडीसाठी निधी उपलब्ध होऊ शकत नाही, अशा विभागांना सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने वृक्षांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. यावेळी श्री.तेली व श्री.मोरे यांनी विभागनिहाय वृक्ष लागवडीचा आढावा घेतला. विभागांना केवळ लागवड करून चालणार नाही तर लावलेल्या वृक्षांचे पुढील पाच वर्ष संगोपण देखील करायचे आहे, त्यादृष्टीने देखील नियोजन करण्यात यावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. बैठकीला दृरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका कृषि अधिकारी व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.