तभा वृत्तसेवा
ढाणकी,
dispute-over-instagram-status : समाज माध्यमावरील एका क्षुल्लक स्टेटसचे रूपांतर गंभीर हाणामारीत होऊन एका तरुणावर जीवघेणा चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना ढाणकी येथे मंगळवार, 8 जून रोजी घडली.
मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून धारदार चाकूने केलेल्या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बिटरगाव पोलिस ठाण्यात तब्बल 13 जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार हर्षद संतोष खटके हा संत गाडगेबाबा विद्यालयात अकरावीत शिकतो. सोमवार, 8 जून रोजी दुपारी आरोपी अमन पठाण याने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर हाताला सलाईन लावल्याचे एक स्टेटस ठेवले होते. त्यावर हर्षदने ‘स्माईल’ची इमोजी पाठवल्यामुळे दोघांमध्ये ऑनलाईन वाद झाला होता.
त्याच दिवशी रात्री 8.30 च्या सुमारास हर्षद व त्याचे इतर मित्र ढाणकी येथील सहारा पार्क येथे गोलू गिरी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यावेळी दुपारी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी मुख्य आरोपी हा धम्मदीप संजय काळबांडे व इतर 10 जणांसह चार दुचाकीवरून सहारा पार्क येथे आले. त्यांनी हर्षदसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने धम्मदीपने फोन करून त्याच्या आणखी 3 मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले.
हर्षदने दुपारच्या प्रकरणावरून त्यांची माफीही मागितली. परंतु आरोपींनी ऐकले नाही. आरोपी सूरज काळबांडे याने हर्षद व त्याच्या मित्राला कानाखाली मारली. यावेळी गोलू गिरी हा वाद सोडवण्यासाठीमध्ये पडला असता, आरोपी धम्मदीप काळबांडे याने कमरेचा चाकू उपसून तुम्हाला एक-एक करून खतमच करतो, अशी धमकी देत थेट गोलूच्या मानेवर चाकूने जीवघेणा वार केला. यामध्ये गोलू गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.
गोलूला वाचवण्यासाठी धावलेला मित्र ओमकार भुसावळे याच्या पाठीवर धम्मदीपने चाकूने वार केले. तसेच हर्षद याच्या डाव्या बरगडीवरही चाकूने वार करून त्याला जखमी केले. त्याच वेळी रस्त्यावरून पोलिसांची गाडी येत असल्याचे दिसताच सर्व आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
जखमी गोलू गिरी व ओमकार भुसावळे यांना तातडीने ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे रेफर केले आहे.
या घटनेनंतर हर्षद खटके याच्या तक्रारीवरून बिटरगाव पोलिसांनी मुख्य आरोपी धम्मदीप काळबांडे, सूरज काळबांडे, मोहन काळबांडे, सुनील काळबांडे, मेधन काळबांडे, सम्यक काळबांडे, अजय काळबांडे, अनिकेत काळबांडे, गोपाळ रावते, अमन बुरेखान पठाण, रंजित वाढवे, पवन कांबळे व शेख असलम (सर्व रा. सावळेश्वर, मन्याळी व बिटरगाव) अशा 13 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा नोंद होताचा सर्व आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पांडुरंग शिंदे, उपनिरीक्षक सागर अन्नमावर, रवी गिते, दत्ता हिंगडे, सतीश परतके, राहुल सोळंके, मोहन चाटे, अर्जुन राठोड, हिंमत जाधव, प्रकाश मुढे, इम्रान खान, सुदर्शन जाधव, शरद चव्हाण, प्रवीण जाधव, अंबादास गारुळे, दत्ता कवडेकर, प्रकाश केंद्रे यांनी पार पाडली.