बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
सेलू, 
Farmland suitable for sowing यावर्षीचा रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत बळीराजाने आपले शेत खरीप हंगामासाठी सज्ज केले असताना आता बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. रोहिणी नक्षत्रात फत वादळ वारा आला पाहिजे तसा पाऊस आला नाही. त्यामुळे आता बळीराजाचे लक्ष मृग नक्षत्रावर आहे. मशागत करून शेतकर्‍यांनी आपली शेतजमीन पेरणी योग्य केली आहे. चांगला पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास पीक जोमात येते अन् उत्पादनात वाढ होत असल्याचे सांगितल्या जाते. अश्यातच शेतकर्‍यांनी कृषी केंद्रात बी-बियाणे खरेदीसाठी चाचपणी सुरू केली आहे. कोणते वाण चांगले राहील याची चर्चा शेतकरी आपसात करीत आहे.
 
 
setkari
 
शासनाच्या नियम व अटी पाहता कृषी केंद्र चालक नगदीच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. शेतीचा महागडा खर्च, सततची नापिकी यामुळे ग्रामीण भागात थांबलेले अर्थचक्र पाहता शेतकर्‍यांपुढे मोठा आर्थिक प्रश्न उभा ठाकला आहे. तरी शेतकर्‍यांच्या नजरा आकाशात ढग येतील आणि पाऊस येईल याकडे चातकाप्रमाणे नजरा लागल्या आहे. सेलू येथील बँक ऑफ इंडियामध्ये पीक कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली असून कर्जाची फाईल १५ दिवसापासून पुढे सरकत नसल्याने शेतकर्‍यांना बँकेच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहे. अचानक चांगला पाऊस आला अन् पीक कर्ज मिळाले नाही तर शेतकर्‍यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. ग्रामीण भागात अनेक अवैध सावकारी करणारे असून काहीजण बचतगटाला हाताशी धरून सावकारी करताना दिसत आहे.
 
 
कर्जमाफीकडे लक्ष
थकीत असणार्‍या शेतकर्‍यांचे शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीकडे लक्ष लागले असून आपण या कर्जमाफीमध्ये बसणार की नाही याकडे नजरा लागल्या आहे. त्यामुळे पेरणीची वेळ अन् कर्ज मिळविण्यासाठी धडपड, कर्ज माफीची धाकधूक यात तूर्तास बळीराजा सापडला आहे. ३० जून रोजी कर्जमाफी होणार आहे. पण त्याअगोदर पेरणीचा हंगाम येत आहे. अश्यातच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना कृषी केंद्राचे व्यवहार उधारीवर करावे लागतील नाही तर सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पयार्य नाही.