मस्कट होंडा शोरूमला आग

होंडा कंपनीच्या अनेक दुचाकी जळून खाक

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
हिंगणा,
Fire at Muscat Honda showroom हिंगणा वाडी मार्गावरील मस्कट होंडा कंपनीच्या शोरूमला आज (ता.८) रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत शोरूम मधील होंडा कंपनीच्या अनेक दुचाकी जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल तीन तासानंतर अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही आग नियंत्रणाखाली आणली. हिंगणा -वाडी मार्गावर इंदिरा राजे भोसले यांच्या मालकीचे हिरो होंडा कंपनीचे मस्कट शोरूम आहे. या ठिकाणी नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर असताना अचानक सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास जनरेटर रूमला आग लागली. पाहता पाहता आगीचे लोट दिसू लागले. वाडी रोडवरील संपूर्ण परिसरात धुर दिसू लागला. तातडीने एमआयडीसी अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.
 
 
 
214
 
 
विभागीय अग्निशामक अधिकारी आनंद परब दोन अग्निशामक गाड्या घेऊन तातडीने पोहचले. आग भीषण स्वरूपात असल्याने निलडोह, हिंगणा नगरपंचायत, डिगडोह नगर परिषद व त्रिमूर्ती नगर येथील नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातून अग्निशामक गाड्या बोलाविण्यात आल्या. आग भीषण असल्याने तब्बल तीन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक विभागाला यश आले. ११ वाजताच्या दरम्यान परिस्थिती नियंत्रणाखाली आल्याची माहिती विभागीय अग्निशामक अधिकारी परब यांनी दिली. या आगीत होंडा कंपनीची अनेक दुचाकी वाहने जळून खाक झाली. यामुळे कंपनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीसही दाखल झाले होते.