पारव्यातील पहिल्याच पावसाने महावितरणची ‘बत्तीगुल’

तब्बल 12 तास नागरिक अंधारात

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा, 
first-rain-out-power-supply : घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकèयांना दिलासा दिला असला, तरी महावितरणच्या मान्सूनपूर्व नियोजनाचे मात्र पुरते धिंडवडे उडाले आहेत. अवघ्या दोन तासांच्या पावसाने संपूर्ण परिसर तब्बल 12 तास अंधारात बुडाला होता.
 
 
 
power cut
 
 
 
सोमवार, 8 जून रोजी रात्री 11 च्या सुमारास ढगांच्या गडगडाटांसह मृगाच्या पावसाला सुरुवात झाली. रात्री 1 वाजेपर्यंत म्हणजेच सलग दोन तास परिसरात धुव्वाधार पाऊस कोसळला. मात्र त्याच वेळी गेलेली वीज थेट दुसèया दिवशी दुपारी 1 वाजता आली. पहिल्या पावसाच्या गारव्याचा आनंद घेण्याऐवजी या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील नागरिकांना रात्रभर उकाडा आणि अंधाराचा सामना करावा लागला.
 
 
महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. झाडांच्या फांद्या छाटणे आणि डीपी दुरुस्तीचे मोठे दावे केले जातात. मात्र, पहिल्याच पावसाच्या केवळ दोन तासांत विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महावितरणचा हा दावा पारवा परिसरात पूर्णपणे फोल ठरला आहे.
 
 
मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच झालेल्या या सुंदर पावसामुळे आदिवासीबहुल भागातील बळीराजा सुखावला असून, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी विजेचा असा लपंडाव सुरू झाल्याने शेतकèयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पारवा पोलिस ठाणे अंतर्गत सर्व गावांमधे पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे.