धान खरेदीचे 481.94 कोटी रुपये रखडले

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
- 46 हजारांहून अधिक शेतकरी आर्थिक अडचणीत

गोंदिया,
Gondia paddy growing farmer खरीप हंगामाची लगबग सुरू असताना गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. उन्हाळी हंगामातील शासकीय धान खरेदी केंद्रांवर विक्री केलेल्या धानाचे तब्बल 481 कोटी 94 लाख रुपयांचे देयक अद्यापही प्रलंबित असल्याने 46 हजार 103 शेतकरी चुकार्‍याच्या प्रतीक्षेत आहेत.
 
 
dhan
 
जिल्ह्यातील 191 खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 20 लाख 30 हजार 432 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 2369 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली असली तरी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. यंदा उन्हाळी हंगामात धान विक्रीसाठी 77 हजार 620 शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 46 हजार 103 शेतकर्‍यांकडून खरेदी पूर्ण झाली असूनही देयके रखडल्याने शासन व प्रशासनाप्रती शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, 31 हजार 517 नोंदणीकृत शेतकरी अद्यापही धान विक्री करू शकलेले नाहीत, त्यामुळे खरेदी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून बियाणे, खते, कीडनाशके व शेती मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. मात्र, धान विक्रीचे पैसे वेळेवर न मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांना कर्ज किंवा खासगी सावकारांचा आधार घ्यावा लागत आहे. देयके रखडल्याने आणि खरेदी प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून प्रलंबित रक्कम अदा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

नोंदणी व खरेदीची मुदत वाढ...
खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत धान व भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची मुदत 10 जूनपर्यंत वाढविण्यात आली असताना धान व भरड धान्य खरेदीची अंतिम मुदत 30 जून निश्चित करण्यात आली आहे. यामुळे अद्याप नोंदणी न झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
 
 
शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ...
शासनाकडून निधी उपलब्ध होताच शेतकर्‍यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली. मात्र, प्रत्यक्ष निधी कधी मिळणार याबाबत निश्चितता नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.