शेंदूरजना घाट पोलिसांची कारवाई
वरूड,
Gutkha smuggler अमरावती शहर पोलिस दलात कार्यरत असलेला एक पोलिस अंमलदारच गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करताना रंगेहात पकडला गेला आहे. शेंदूरजना घाट पोलिसांच्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ही कारवाई ८ जून रोजी मध्यरात्रीनंतर पुसला ते पांढुर्णा रोडवरील टोल नाक्याजवळ झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या पोलिस अंमदाराचे नाव पंकज दवंडे आहे.
माहितीनुसार, शेंदुरजनाघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसला ते पांढुर्णा रोडवरील टोल नाक्याजवळ पोलिसांनी एका संशयास्पद पांढर्या रंगाच्या कारला थांबवून त्याची झडती घेतली. यावेळी कारची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. पोलिसांनी कारवाई करत सुमारे २ लाख ४७ हजार ८० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली ४.५ लाखांची कार, असा एकूण ६ लाख ९७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या संपूर्ण कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पकडण्यात आलेला मुख्य आरोपी पंकज दवंडे हा अमरावती शहर पोलिस आयुक्तालयातच अंमलदार म्हणून कार्यरत आहे. सध्या त्याची नियुक्ती दंगल नियंत्रण पथकात आहे. पोलिसांनी त्याला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करीत आहे.