तभा वृत्तसेवा
पुसद,
hindu-garjana-pratishthan : पुसद शहरामध्ये हिंदू गर्जना प्रतिष्ठानद्वारा संचालित शिवशौर्य मर्दानी आखाडा व शौर्य आत्मरक्षा प्रशिक्षण केंद्राद्वारे 6 व 7 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये लाठीकाठी, भाला, तलवारबाजी, उर्मी, मुदगल, दांडपट्टा, चक्र इत्यादी शिवकालीन शस्त्रविद्या व मर्दानी खेळांचा परिचय व प्रशिक्षण देण्यात आले. वानरे मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडले. 8 ते 15 वयोगटातील 67 मुली व 33 मुले अशा एकूण 100 विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला.
शिवकालीन शस्त्रविद्या व मर्दानी खेळांच्या शारीरिक प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी योगासने, बौद्धिक विकासासाठी संस्कृत स्तोत्र व सुभाषिते तसेच भारतीय संस्कृती, सामाजिक प्रथा, पर्यावरण, कुटुंब व्यवस्था, व्यायाम व मुलींकरता आत्मरक्षा या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन केले गेले.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अहिल्यानगर व अमरावती येथून प्रशिक्षक बोलविण्यात आले होते. तसेच हिंदू गर्जना प्रतिष्ठान, पुसदचे अध्यक्ष सागर सुधीर सरनाईक यांनीही मार्गदर्शन केले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमामध्ये मुलांनी अवगत केलेल्या कलांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या शिबिरासाठी हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे सदस्य आशिष शुक्ला, रवींद्र घड्याळे, अमोल आरगुलवार, स्वप्निल महाजन, संतोष भगत, श्रीधर सरनाईक, वासंती सरनाईक, अमृता सरनाईक, अश्विन ठवकर, अभिनव बयास, लक्ष्मण शिरडकर, पवन बोजेवार यांनी परिश्रम घेतले.