दहशतवादावरून भारताचा पाकिस्तानला चपराक

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
न्यूयॉर्क,
India slaps Pakistan over terrorism संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानवर जोरदार टीका करत दहशतवाद आणि अपप्रचाराच्या मुद्द्यावर त्याला कोंडीत पकडले. अफगाणिस्तानातील परिस्थितीवर आयोजित बैठकीदरम्यान भारताने पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना ठामपणे उत्तर देत त्याच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानकडून काही गटांना दिल्या जाणाऱ्या नव्या संबोधनावर टीका करत ही केवळ दिशाभूल करणारी प्रचार मोहीम असल्याचे म्हटले. धार्मिक भावनांचा आधार घेत भारताविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताने यावेळी पाकिस्तानमधील सत्ताधारी व्यवस्थेवरही निशाणा साधला. देशातील राजकीय आणि आर्थिक अडचणींपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भारतविरोधी वातावरण तयार केले जात असल्याचा दावा भारतीय प्रतिनिधींनी केला.

 terrorism un
 
शेजारी देशांवर आरोप करून स्वतःच्या अपयशाचे खापर फोडण्याची प्रवृत्ती पाकिस्तानमध्ये कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले.बैठकीत अफगाणिस्तानातील घडामोडींचा संदर्भ देताना भारताने नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला. निरपराध नागरिकांचे प्राण घेणाऱ्या कारवायांना दहशतवादविरोधी मोहिमेचे स्वरूप देणे अयोग्य असल्याचे भारताने स्पष्ट केले. अशा घटनांमुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण होत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला वस्तुस्थिती ओळखण्याचे आवाहन करत दहशतवादाविरोधातील लढ्यात दुहेरी भूमिका स्वीकारू नये, असेही स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून भारताने मांडलेल्या या भूमिकेमुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.