जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश
पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना
नागरिकांना मोठा दिलासा
यवतमाळ,
Isapur Dam उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील 44 गावांमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून आरक्षित पिण्याच्या पाण्यापैकी 3 दशलक्ष घनमिटर पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटल्याने गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ग्रामस्थ व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरक्षित पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.
Isapur Dam याबाबत यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकाèयांकडे शिफारस केली होती. त्यानुसार ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणात सध्या 423.3245 दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून यापूर्वी 9 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. आता अतिरिक्त 3 दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशांनुसार, हे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडून नदीकाठावरील गावांतील नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निर्माण होणार आहे. या निर्णयामुळे उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील 44 गावांतील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.