विप्लव बाजोरीया यांची याचिका खारीज

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
विधान परिषदेची अमरावती निवडणूक
 
अमरावती, 
Legislative Council, Amravati विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक लढविण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणार्‍या विप्लव बाजोरीया यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना याचिका मागे घ्या अन्यथा फेटाळली जाईल. तसेच उच्च न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण करा व समाधान झाले नाही तर आमच्याकडे या असे सांगितले. त्यानुसार बाजोरिया यांनी याचिका मागे घेतली.
 
 
bajoria
 
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरीया यांनी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर अन्य तीन उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर छाननी दरम्यान जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बाजोरीया यांचा अर्ज अवैध ठरविला होता. या निर्णयाला बाजोरीया यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. मात्र, तेथे त्यांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार देत १७ जूनला सुनावणी ठेवली होती.
 
 
दरम्यान, विपल्व यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत विशेष रजा याचिका दाखल केली. त्यावर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. न्यायमुर्ती पी. के. मिश्रा यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्या मिश्रा यांनी ही याचिका सुनावणी योग्य नसल्याचा निर्वाळा देत ती याचिकाकर्त्याने मागे घ्यावी किंवा न्यायालय ती फेटाळून लावेल असे पर्याय दिलेत. बाजोरीया यांनी याचिका मागे घेत असल्याचे मान्य केल्यानंतर ती न्यायालयाने खारीज केली. भाजपा उमेदवार प्रवीण पोटे यांनी कॅवेट दाखल केले होते. त्यांच्यावतीने अ‍ॅड. श्रेयस ललीत यांनी कामकाज बघीतले. अ‍ॅड. संदीप गुप्ता व अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनी त्यांना सहकार्य केले.
 
लढाई अजून संपलेली नाही
आमची न्यायालयीन लढाई अजून संपलेली नाही. ती अखेरच्या क्षणापर्यंत लढणार आहे. निवडणूक याचिका दाखल कऱण्यापुर्वी उच्च न्यायालयास आम्ही निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची नाही तर, निवडणूकीत सहभागी होऊ देण्याची विनंती करणार आहे. बुधवार १० जूनला यासंदर्भातील प्रार्थना अर्ज विप्लव बाजोरिया उच्च न्यायालयात कऱणार आहे. आम्ही अखरेच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करणार असून लढाई अर्ध्यावर सोडणार नाही.
-गोपीकिशन बाजोरीया
माजी आमदार