अर्जुनी मोरगावात अवैध उत्खननाला अभय कुणाचे?

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
- महसूल प्रशासनावर संगनमताचा आरोप :  तक्रारींनंतरही कारवाईचा अभाव

अर्जुनी मोरगाव, 
Illegal excavation in Arjuni Morgaon तालुक्यातील आदिवासीबहुल व जंगलव्याप्त नवेगावबांध तलाव परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती व मुरूम उत्खननाच्या प्रकरणामुळे महसूल प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रभावी आणि व्यापक कारवाई होत नसल्याचा आरोप करत महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणात प्रभारी तहसीलदार मंगेश क्षीरसागर यांच्या भूमिकेबाबतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
gorei
 
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी नवेगावबांध तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. घटनास्थळी एक जेसीबी आणि अनेक ट्रॅक्टरच्या माध्यमातून उत्खनन सुरू असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. मात्र, महसूल विभागाने केवळ एका ट्रॅक्टरवरच कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या कारवाईनंतरही अवैध उत्खनन थांबले नसून नागरिकांच्या म्हणण्यानुसार, 24 मे रोजी पुन्हा त्याच परिसरात उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. याबाबत प्रभारी तहसीलदार मंगेश क्षीरसागर यांना माहिती देण्यात आली असता, ‘आज, रविवार असल्याने कारवाई करता येणार नाही,’ असे उत्तर दिल्याचे तक्रारदारांचे म्हणने आहे. या कथित उत्तरामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, अवैध उत्खननासारख्या गंभीर प्रकारावर सुट्टीच्या दिवशी कारवाई होऊ शकत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र, चौकशी प्रक्रियेवरही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले असून ज्या अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार करण्यात आली, त्याच कार्यालयातून चौकशीसंदर्भातील पत्र निर्गमित करण्यात आल्याने चौकशीची निष्पक्षता आणि पारदर्शकता याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याशिवाय, या प्रकरणाची चौकशी समकक्ष दर्जाच्या अधिकार्‍याकडे सोपविण्यात आल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चौकशी करणार्‍या अधिकार्‍यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही का? चौकशी अहवाल वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष असेल का? अशा स्वरूपाच्या चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, चौकशी अहवालात नेमके काय निष्कर्ष निघतात, प्रशासन अवैध उत्खननाविरोधात कितपत कठोर भूमिका घेते आणि नागरिकांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आढळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.