हमीदवाडा,
Mauli's horses towards Alandi वारकरी संप्रदायातील आषाढी वारी सोहळ्यात माऊलींच्या अश्वांना विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. शेकडो वर्षांची परंपरा जपत यंदाही कर्नाटकातील अंकली येथून माऊलींचे मानाचे अश्व आळंदीकडे प्रस्थान करणार आहेत. २७ जून रोजी द्वादशीच्या मुहूर्तावर या पायी प्रवासाची सुरुवात होणार असून वारीच्या तयारीला वेग आला आहे.वारकरी परंपरेनुसार माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणारे हे अश्व केवळ प्रतीकात्मक नसून श्रद्धेचे केंद्र मानले जातात. आळंदी ते पंढरपूर या वारीदरम्यान होणाऱ्या रिंगण सोहळ्यात त्यांची प्रमुख भूमिका असते. विशेष म्हणजे हे अश्व कोणत्याही वाहनातून नेले जात नाहीत, तर अंकली ते आळंदी हा संपूर्ण प्रवास पायी पूर्ण करतात.
ही मानाची जबाबदारी कर्नाटकातील शितोळे घराण्याकडे पिढ्यानपिढ्या आहे. सध्या उर्जितसिंगराजे शितोळे ही परंपरा जपत आहेत. वारीत दोन अश्व सहभागी होतात. त्यापैकी एकाला माऊलींचा अश्व मानले जाते, तर दुसरा अश्व जरीपटका धारण करणाऱ्या अश्वस्वारासाठी असतो. वारकऱ्यांमध्ये अशी श्रद्धा आहे की माऊलींच्या अश्वावर प्रत्यक्ष कोणीही स्वार होत नाही, कारण त्या अश्वावर स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींचे अस्तित्व असल्याचे मानले जाते.हैबतबाबांनी १८३२ मध्ये पालखी सोहळ्याला संघटित स्वरूप दिल्यानंतर शितोळे सरकारांनी या सोहळ्याला राजाश्रय दिला. त्यानंतर माऊलींच्या पादुकांच्या मुक्कामापासून ते समाजआरती आणि विविध धार्मिक विधींपर्यंत अनेक परंपरा आजही अविरत सुरू आहेत. वारीतील अनेक महत्त्वाचे निर्णयही पारंपरिक पद्धतीने शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली घेतले जातात. यंदा ८ जुलै रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असून २५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. त्याआधी मानाच्या अश्वांच्या प्रस्थानामुळे वारकरी संप्रदायात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.