वर्धा,
goras bhandar crisis गोरस भंडारवरील प्रशासकीय कारवाईनंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी व कर्मचारी-वितरक यांची संयुक्त समन्वय बैठक नक्षत्रम लॉन येथे पार पडली. गोदुग्ध गोरस भंडार आझाद क्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष इंजि. तुषार उमाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गोरस भंडारवरील बंदी उठेपर्यंत पर्यायी स्वरूपात दूध वितरण व्यवस्था उभारण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाने गोरस भंडारचा परवाना रद्द केल्यानंतर संस्थेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी, दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी, वितरक आणि ग्राहक यांच्यासमोर आर्थिक व सामाजिक संकट उभे राहिले आहे. नऊ दिवसांपासून ग्राहकांना नियमित दूधपुरवठा होत नसल्यामुळे अनेक ग्राहकांनी पर्यायी व्यवस्था स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात ग्राहक कायमस्वरूपी इतरत्र वळल्यास त्याचा परिणाम संस्थेवर होऊ शकतो, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर ग्राहक, शेतकरी व कर्मचारी यांचे हित जपण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दूध उत्पादकांनी थेट वितरकांना दूध पुरवावे आणि वितरकांनी ते नेहमीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावे, असा प्रस्ताव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. यानुसार वितरक दूध उत्पादकांकडून ४३ रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करतील. खरेदी केलेल्या दुधाचे पैसे दुसऱ्या दिवशी संबंधित उत्पादकांना अदा करण्यात येतील.
दुधाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी दूध उत्पादक व वितरक यांच्याकडून प्रत्येकी एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार असून आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि सुरळीत राहण्यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे.goras bhandar crisis ही व्यवस्था पूर्णपणे तात्पुरती असून गोरस भंडारचे कामकाज पूर्ववत सुरू झाल्यानंतर सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे संस्थेमार्फतच चालविण्यात येतील.
या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या-आपल्या गावांमध्ये जाऊन संबंधित दूध उत्पादकांशी चर्चा व बैठका घेऊन या प्रस्तावाबाबतचा अंतिम निर्णय पुढील दोन दिवसांत कळविण्यात येईल, असे सांगितले. परस्पर समन्वय, संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून या प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा यावेळी इंजि. तुषार उमाळे यांनी व्यक्त केली. या बैठकीस विजेंद्र नाईक, राहुल गजभिये, धीरज बनसोड, अजय कंकाळ, चारुदत्त कावळे, बिपिन नगराळे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते तसेच दूध उत्पादक शेतकरी आणि कर्मचारी-वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.