नागपूर,
Narendra Nagar Ground Cleanup नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी नागपूर महापालिकेच्या वतीने पर्यावरण पंधरवाड्यानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या विशेष स्वच्छता अभियानाला नरेंद्र नगर मैदानावर झालेल्या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुण भारतच्या पुढाकारातून आणि लक्ष्यवेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्यातून विशेष स्वच्छता मोहीम राबवीण्यात आली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे उपासनी सरांच्या नेतृत्वात तब्बल ४० हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी स्वतः पुढाकार घेत मैदानाची स्वच्छता करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
दिव्यांग असलो तरी आम्हीही समाजाचेच घटक
सकाळच्या प्रसन्न वातावरणात, हातमोजे व तोंडावर मास्क लावून मोहिमेत सहभागी होण्यासाठी चिमुकले सज्ज होते. हातात झाडू, कचऱ्याच्या पिशव्या आणि स्वच्छतेचा दृढ संकल्प घेऊन मैदानात उतरलेल्या दिव्यांग मुला-मुलींनी प्लास्टिक व इतर कचरा वेचत परिसर स्वच्छ केला. त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. "दिव्यांग असलो तरी आम्हीही समाजाचेच घटक आहोत आणि समाजाप्रती आमचीही जबाबदारी आहे," हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.

तरुण भारतच्या पुढाकारातून आणि लक्ष्यवेध स्पोर्ट्स अकादमीच्या सहकार्याने आयोजित या मोहिमेत केवळ खेळाडूच नव्हे, तर त्यांच्या पालकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. मुलांसोबत मैदानात उतरून त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक पालकांच्या डोळ्यांत आपल्या मुलांचा अभिमान स्पष्टपणे दिसत होता. 'आजच्या या उपक्रमामुळे आमच्या मुलांमध्ये सामाजिक जाणीव अधिक दृढ होईल. ते आता स्वतः स्वच्छतेबाबत जागरूक राहतील आणि इतरांनाही प्रेरणा देतील,' अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. स्वच्छता मोहिमेदरम्यान मुलांनी प्लास्टिकचा कचरा गोळा करून कचरागाडीत टाकला आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, याची प्रचीती या उपक्रमातून आली.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश दिव्यांग खेळाडूंनी आपल्या कृतीतून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवला. या प्रसंगी लक्ष्यवेध बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत दुचक्के, सचिव जितेंद्र बोंद्रे, प्रशिक्षक धनंजय उपासनी आणि प्रशांत दशपुत्रे उपस्थित होते. तसेच नगरसेवक विशाखा मोहोड, रमेश भंडारी, पुजा भुगावकर,प्रफुल घाटे, देवेंद्र वाडीभस्मे यांनीही मोहिमेत सहभाग घेत दिव्यांग खेळाडूंचे कौतुक केले. नरेंद्र नगर मैदानावरील ही स्वच्छता मोहीम केवळ परिसर स्वच्छ करण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने सामाजिक समावेशकतेचा, आत्मविश्वासाचा आणि पर्यावरणप्रेमाचा संदेश दिला. समाजाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांग बांधवांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील. दिव्यांग खेळाडूंच्या या प्रेरणादायी कृतीने स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.