सोशल मिडीयावर दिले स्पष्टीकरण
अमरावती,
Navneet Rana खासदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सहभागी होण्याची अट मला मान्य नव्हती. मी भाजपाची प्रामाणिक कार्यकर्ता आहे, कोणत्याही पदासाठी आपली विचारधार बदलणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून निवडून द्यायाच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, सदर जागा सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती. त्यामुळे ती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कोट्यात होती. त्या संदर्भात घडलेल्या सर्व घडामोडीवर नवनीत राणा यांनी सोशल मिडीयावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, आधुनिक भारताची उभारणी करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कणखर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे काम करणारी मी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता आहे.
Navneet Rana मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिक पणे करीत राहील. आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्या बाबत विनंती केली होती, मात्र अपरिहार्य कारणास्तव ते शक्य झाले नाही. सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु, काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरी देखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांची आभारी असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.