चार दिवसांत खरेदी केंद्र सुरू न झाल्यास उपोषण

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
रंगय्यापल्ली, 
Paddy Procurement Centre विठ्ठलरावपेठा धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धान खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. धानाची तातडीने सोसायटीमार्फत खरेदी सुरू करावी, अन्यथा पुढील चार दिवसांत तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
 
 
Nivedan
 
विठ्ठलरावपेठा हे परिसरातील प्रमुख धान खरेदी केंद्र असून या केंद्राअंतर्गत अनेक गावांतील शेतकरी धान विक्रीसाठी अवलंबून आहेत. मागील वर्षांप्रमाणे यंदाही सोसायटीमार्फत धान खरेदी होईल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी धान साठवून ठेवले आहे. मात्र खरेदी प्रक्रियेला अद्याप प्रारंभ न झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. पावसाळ्याची सुरुवात झाल्याने साठवून ठेवलेल्या धानाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस अथवा प्रतिकूल हवामानामुळे धान खराब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा सूर शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या खर्चाने व मेहनतीने घेतलेले पीक विक्रीअभावी अडकून पडल्याने आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याची खंतही त्यांनी मांडली आहे.
 
 
Paddy Procurement Centre  धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता वाढत असून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी सिरोंचा, पोलिस निरीक्षक सिरोंचा तसेच पोलिस निरीक्षक रेगुंठा यांनाही माहितीस्तव देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शेतकर्‍यांच्या मागण्यांची दखल घेऊन विठ्ठलरावपेठा केंद्रावरील धान खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.