राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर; यलो अलर्ट जारी

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
मुंबई,
pre-monsoon rain in the state गोवा पार करून मान्सूनने तळकोकणातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांपर्यंत मजल मारली असली तरी राज्यातील इतर भागांमध्ये अजूनही नैऋत्य मौसमी वारे पूर्णपणे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे राज्यात उकाड्याचे प्रमाण कायम असून नागरिकांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह कोसळणारा पाऊस हा मान्सूनचा नसून पूर्वमोसमी पाऊस असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असला तरी खरीप हंगामासाठी आवश्यक सातत्यपूर्ण पाऊस अद्याप सुरू झालेला नाही.
 
 
 
fg6
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. समुद्रातील वाऱ्यांचे बदल, उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव आणि हवामानातील इतर घटकांमुळे मान्सूनच्या प्रगतीचा वेग काहीसा मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. खरीप हंगामासाठी सतत आणि स्थिर पावसाची आवश्यकता असल्याने योग्य वेळेची प्रतीक्षा करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आगामी काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.