वर्धा,
nature tourism project जिल्ह्यातील वन विभागांतर्गत मंजूर असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.

वनभवन इमारतीच्या बांधकामास वित्तीय मान्यता तसेच सालोड (हिरापूर) येथील निसर्ग पर्यटन प्रकल्पासाठी उर्वरित निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२६ मध्ये दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार वर्धा येथील उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात वनभवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतीत उपवनसंरक्षक, वर्धा वनविभाग, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक आणि सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी यांची कार्यालये एकाच छताखाली कार्यरत होणार आहेत. मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अद्याप वित्तीय मान्यता मिळालेली नसल्याने काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली.nature tourism project तसेच निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत सालोड (हिरापूर) येथे सुमारे १३.१८ कोटी रुपयांच्या पर्यटन विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत केवळ १ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी प्राप्त न झाल्यामुळे प्रकल्पाची गती मंदावली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन व वनविकासाच्या दृष्टीने ही दोन्ही कामे अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना तातडीने निधी देण्याची मागणी केली.