निधा-सिरसगाव मार्गावर ‘ते’ झाड मोडेल हाड

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
आजनसरा, 
Saint Bhojaji Maharaj निधा ते सिरसगाव मार्गावर अपघाताला निमंत्रण देणारे दृश्य समोर आले आहे. रस्त्याच्या कडेला अर्धवट तुटून पडलेले महाकाय असे वाळलेले झाड कोणत्याही क्षणी धाराशाही होऊन मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. पावसाळ्याचे आगमण वादळी होते. त्या वादळात हे झाड कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शयता नाकारता येत नाहे.
 
 
ajan
 
हा मार्ग आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांच्या तीर्थक्षेत्राकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने दररोज शेकडो भाविकांची वाहनं या रस्त्याहून प्रवास करतात. दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या वाहनांच्या रांगा लागत असताना हे धोकादायक झाड काळ बनून उभे आहे. एखाद्या भाविकाच्या वाहनावर झाड कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यत होत आहे. या झाडाचा मोठा भाग आधीच रस्त्यावर आडवा पडला आहे तर उर्वरित खोड धोकादायक अवस्थेत आहे. अरुंद रस्त्यावरून जाताना भाविक व स्थानिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. गेले कित्येक दिवस हे झाड अशाच अवस्थेत आहे. तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि निधा- टाकळीचे ग्रामसेवक, प्रशासक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 
 
पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्यालगतची धोकादायक झाडे हटवणे बंधनकारक असते. मात्र, तीर्थक्षेत्राच्या मार्गावर नियम केवळ कागदावरच दिसतात. या झाडामुळे एकेरी वाहतूक सुरू असून समोरून वाहन आल्यास अपघाताची शयता वाढते. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा होणार्‍या जीवितहानीस प्रशासन जबाबदार राहील, असाही सूर उमटू लागला आहे.