तांत्रिक बिघाडामुळे सौरकृषी पंप जळून खाक

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
सायतखर्डाच्या शेतकऱ्याचे पाऊण लाखाचे नुकसान

पारवा, 
Sayatkharda Farmer घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्यांतर्गत सायतखर्डा शेतशिवारात तांत्रिक बिघाडामुळे सौर कृषीपंपाच्या साहित्याला भीषण आग लागली. या आगीत सौर कृषीपंप जळून खाक झाल यात शेतकèयाचे 72 हजार रुपयांचे नुकसान झाले. सायतखर्डा येथील अल्पभूधारक शेतकरी सुधाकर लिंबाजी मोहुर्ले यांना शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ अंतर्गत सिद्धकला कंपनीचा 5 एचपी क्षमतेचा सौर पंप मंजूर झाला होता. त्यानुसार त्यांच्या गट 261 मधील 3 एकर शेतात विहिरीजवळ 5-6 महिन्यांपूर्वीच हा संपूर्ण संच बसवण्यात आला होता.
 
 
saur
 
गेल्या काही दिवसांपासून या सोलर प्लेट्सच्या ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे स्पार्किंग होत होते. काही दिवसांपूर्वी मोहुर्ले हे शेतात कामासाठी गेले असता, त्यांना विहिरीजवळील सौर प्लेट्स, स्कॅनर बॉक्स, केबल, सेक्शन पाईप, 30 स्प्रिंकलर पाईप व 8 स्प्रिंकलर नोझल जळत असल्याचे दिसून आले. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिस ठाण्याचे संदीप महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच सायतखर्डा ग्रामपंचायतचे पोलिस पाटील प्रभाकर देशमुख व सरपंच यांच्या उपस्थितीत गावातील पंचांनीही घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून मिळालेला पंप असा अचानक जळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित सिद्धकला कंपनी व कृषी विभागाने तत्काळ या नुकसानीची पाहणी करून नवीन सौर पंप मंजूर करावा, अशी मागणी सायतखर्डा ग्रामस्थ व पीडित शेतकèयाने केली आहे.