महाराष्ट्रात पावसाची दमदार एन्ट्री!

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Strong arrival of rains in Maharashtra एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा वेग घेत दक्षिण महाराष्ट्रात जोरदार आगमन केले आहे. सोमवारी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत वातावरणात मोठा बदल घडवून आणला. या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.हवामान विभागाने राज्यातील तब्बल २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
 
 

 Maharashtra 
 
मान्सून सध्या कोकणातील रत्नागिरी आणि हरणाईपर्यंत पोहोचला असून कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांमध्येही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. मान्सूनने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्येही प्रवेश केला आहे. त्याची गती काहीशी संथ असली तरी पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील आणखी भाग व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.