- आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश ः नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गोंदिया,
'Sunday on Cycle' Rally सुदृढ शरीर, सशक्त मन आणि सुरक्षित समाज या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्त रूप देत गोंदिया जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जागतिक सायकल दिन आणि ‘फिट इंडिया अभियान’ निमित्त 6 जून रोजी पोलिस मुख्यालय, कारंजा येथे संडे ऑन सायकल या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि पोलिस-जनता संबंध अधिक दृढ करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पोलिस अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय, पोलिस मित्र, विद्यार्थी, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध क्षेत्रांतील सुमारे 250 हून अधिक सायकलप्रेमींनी पोलिस मुख्यालय, कारंजा येथे हजेरी लावली. प्रभारी पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या 5 किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीला सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांनी हिरवी झेंडी दाखवत सायकल रॅलीची औपचारिक सुरुवात केली. ही रॅली फुलचूर मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा पोलिस मुख्यालय येथे विसावली. यावेळी जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व ठाणेदार, शाखा प्रमुख, तसेच अधिनस्त पोलिस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.