तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
technical-education-diploma-admission : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून विद्यार्थ्यांना 20 मे ते 22 जून या दरम्यान ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
 
 
 
jlk
 
 
 
तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता आणि प्रवेश अर्ज शुल्क इत्यादी बाबींची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेत दहावीनंतर पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल, तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना योग्य ती मदत व्हावी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष अर्ज भरू शकतात, त्यांच्या विविध समस्यांचे आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी या केंद्रामधून मार्गदर्शन केले जाणार आहे.
 
 
प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रप्रमुख शिरभाते यांच्याशी संपर्क साधावा, तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळचे प्राचार्य मटाले यांनी केले आहे.