टीएमसी नेते जहांगीर खानला ५ दिवसांची कोठडी

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
कोलकाता,
TMC leader remanded in custody पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे वादग्रस्त नेते जहांगीर खान यांना अखेर अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीचा आदेश दिला आहे. भारत-नेपाळ सीमेवरून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.जहांगीर खान हे निवडणुकांनंतर काही गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले होते. त्यांच्याविरोधात धमकी देणे आणि खंडणीसारख्या आरोपांबाबत तपास सुरू होता. पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबविल्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे त्यांना सीमेवरून अटक करण्यात यश मिळाले.
 

जहांगीर खान 
 
 
यापूर्वी त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र न्यायालयाने तो संरक्षणात्मक आदेश रद्द केल्यानंतर तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला. त्यानंतर ते फरार असल्याची चर्चा होती.बंगालच्या निवडणूक काळात जहांगीर खान यांचे नाव विशेष चर्चेत आले होते. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला दिलेल्या आव्हानामुळे ते राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते. स्वतःची तुलना लोकप्रिय चित्रपटातील ‘पुष्पा’ या पात्राशी केल्याने त्यांना ‘पुष्पा’ या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले.
 
 
दरम्यान, फाल्टा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे निवडणूक आयोगाने मतदान रद्द करून फेरमतदानाचे आदेश दिले होते. या घडामोडींनंतर जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेतली होती. त्यानंतर झालेल्या फेरमतदानात भाजप उमेदवाराने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला, तर तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. सध्या जहांगीर खान यांची पोलीस चौकशी सुरू असून तपास यंत्रणा विविध आरोपांच्या अनुषंगाने अधिक माहिती गोळा करत आहेत.